PM Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे अपात्र शेतकरी केंद्राच्या निशाण्यावर, पैसे परत घेण्याचं काम सुरु

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. सध्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुरु आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत आठ हप्त्यांमध्ये 16 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये 31 जुलैपर्यंत पाठवले जाणार आहेत. पीएम किसान योजना लाभार्थ्यांच्या यादीतून काही शेतकऱ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्याकडून पैसै परत घेण्याचं काम सुरु आहे. (PM Kisan Samman scheme 8th instalment released government starts recovery from beneficiary farmers receive installment on false documents)

पीएम किसान योजनेसाठी अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतला होता. यामध्ये ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचं काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अपात्र शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये परत घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी विभागानं अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याबरोबर त्यांची नाव हटवण्यास सुरुवात केली आहे. दैनिक जागरणनं दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधील कोरडरमा जिल्ह्यातील 578 अपात्र शेतकरी आढळून आले आहेत. ते शेतकरी इन्कम टॅक्स भरत असून देखील त्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Ministry of Agriculture) पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या माहिती असणं आवश्यक आहे. सरकारी अधिकाऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही मात्र, केंद्र आणि राज्य सरकार मधील मल्टी टास्किंग स्टाफ/चतुर्थ श्रेणी/ड श्रेणीतील कर्मचारी यासाठी पात्र आहेत.

पीएम किसान योजनेचा लाभ कुणाला मिळत नाही
(1) संविधानिक पदावर असणारा किंवा मंत्री असणारा शेतकरी
(2) नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, विधानपरीषद आमदार, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य
(3) केंद्र आणि राज्य सरकारमधील अधिकारी
(4) प्राप्तिकर भरणारे शेतकरी
(5) 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे शेतकरी
(6) डॉक्टर, इंजिनिअर, सीए, वकिल

पीएम किसान सन्मान योजनेची घोषणा 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र, पीएम किसान सन्मान योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी 16 लाख 5 हजार 539 शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. आतापर्यंत योजनेअंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये जारी करण्यात आलेल्या 7 व्या हप्त्याच्या रकमेमध्ये 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात आली होती. तर एप्रिल- जुलै 2021 दरम्यान केंद्र सरकारनं 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये पाठवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *