महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारशी निगडीत आहे. त्यांनी याबाबत कायदा केल्यास आरक्षणाचा विषय सुटू शकतो, असा पुर्नउच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका काय? असे विचारले असता इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना एकूण बारा मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यातील पहिला मुद्दा हा मराठा आरक्षणाचा होता. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची माहिती आम्ही दिल्याचे अजित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या निर्णयाला स्थगिती मिळाली. आता अहमदाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त चीफ जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती नेमली आहे. या समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालात ज्या काही सूचना आहेत त्यावर चर्चा होईल.
मराठा आरक्षणासाठी राज्याचे राज्यपाल तसेच पंतप्रधान यांची भेट घेतली आहे. केंद्राने लवकरात लवकर मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणावे व ते मंजूर करावे आणि नंतर कायदा करावा अशी मागणी केली आहे. केंद्राने कायद्यात बदल केल्यानतंरच आरक्षणाचा प्रश्न सुटणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली व संवाद साधला. यावेळी मालोजीराजे छत्रपती, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.