महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । मुंबईनंतर पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा वणवा आता देशातील प्रमुख शहरांमध्ये पसरताना दिसत आहे. आतापर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने केव्हाच शंभरी गाठली आहे. मात्र, आता हैदराबाद या मेट्रो सिटीतही पेट्रोल (Petrol Price) शंभरीपार जाऊन पोहोचले आहे. सोमवारी तेल कंपन्यांकडून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे, पेट्रोलने शंभरी गाठलेले हैदराबाद हे मुंबईनंतर देशातील दुसरे महानगर ठरले. (Petrol and diesel price today 15June 2021)
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर भरभर वाढायला सुरुवात झाली होती. सोमवारी झालेली दरवाढ ही गेल्या सहा आठवडय़ांतील 24 वी दरवाढ असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. सध्या मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 102.58 रुपये, तर डिझेलचा दर 94.70 रुपये इतका आहे. पुण्यातही पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.18 आणि 92.86 इतका आहे. तर नाशिकमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 102.94 आणि 93.59 इतका आहे. ही परिस्थिती बघता लवकरच डिझेलही शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.