नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत ; पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – सध्या देशभरात इंधनाचे भाव वाढल्याने मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. केंद्र सरकार देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Flex fuel engines to get mandatory for carmakers in India says Nitin Gadkari)

वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर आहे. याउलट इथेनॉलचा प्रतिलीटर दर 60 ते 62 रुपये इतका आहे. त्यामुळे वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असल्यास इंधनाच्या खर्चात मोठ्याप्रमाणात बचत होईल, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल.

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *