पेस्ट कंट्रोल करताय तर मग सावधान ; पुण्यात दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; पुणे: घरात केलेल्या पेस्ट कंट्रोल नंतर योग्य ती खबरदारी न घेतल्याने बिबवेवाडीतील गणेश विहार सोसायटीत एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश मजली (वय ६४) आणि अपर्णा मजली (५४) असं या दाम्पत्याचं नाव आहे. या घटनेमुळे बिबवेवाडीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मजली कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं. पेस्ट कंट्रोलनंतर हे कुटुंब त्यांच्या भावाकडे राह्यला गेले होते. पेस्ट कंट्रोलचं काम झाल्यावर काही तासांनी ते पुन्हा गणेश विहार सोसायटीतील आपल्या घरी परतले. त्यावेळी पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तिने त्यांना खबरदारी घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे याची माहिती दिली. मात्र, त्यानंतरही अविनाश मजली आणि अपर्णा मजली यांनी काळजी घेतली नाही. पेस्ट कंट्रोलनंतर घरातील विषारी वायू बाहेर पडण्यासाठी दरवाजे, खिडक्या काही काळासाठी उघडे ठेवावे लागतात. मात्र मजली यांनी घरी आल्यावर दरवाजा आणि खिडक्या लावून घेतल्या आणि दोघेही टीव्ही बघत बसले. घरातील विषारी वायूमुळे काही तासाने दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले. अपर्णा मजली या तर चक्कर येऊन जागेवरच पडल्या. संध्याकाळी जेव्हा मजली यांची मुलगी घरी आली तेव्हा त्यांना आई चक्कर येऊन पडल्याचे आणि वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्यांच्या मुलीने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही रुग्णालयात नेलं.

दरम्यान, गणेश विहार सोसायटीपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच सह्याद्री रुग्णालय आहे. मात्र, या परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने मजली दाम्पत्याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *