महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. 22 जून – महाराष्ट्रात वारीला (Wari) खूप मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दरवर्षी पायी वारी करत असतात. मात्र, गेल्यावर्षीपासून करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे वारी मर्यादित स्वरुपात होत आहे. यंदाही मर्यादित स्वरुपात वारीला परवानगी दिली आहे. त्यातच आता आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी (Curfew in Pandharpur) लागण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. यामुळेच आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पंढरपूर आणि आसपासच्या 10 गावांत संचारबंदी ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. दिनांक 17 पासून ते 25 जुलैपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं, “मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा आषाढी वारी सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात होणार आहे. या संदर्भात मंदिर समितीकडून, माझ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाकडून यावर्षीची वारी कशी होणार याबाबत विस्तृत सूचना आल्या आहेत. त्यानुसार ठराविक भाविकांनाच पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त इतरांनी गर्दी करु नये आणि कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश काढण्यासंदर्भात आमच्याकडून विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यानुसार पंढरपूर आणि आसपासची 10 गावांत संचारबंदी ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. दिनांक 17 पासून ते 25 जुलैपर्यंत ठेवण्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच चंद्रभागा पात्रातील स्नानाबाबत निर्बंधांविषयी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे आणि लवकरच याबाबत आदेश पारित होणे अपेक्षित आहे.”
सर्व भाविकांना विनंती करण्यात येत आहे की, वारीसाठी ठराविक व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही परवानगी देण्यात येणार नाहीये. आषाढी वारी आणि कार्तिक वारी निमित्त जसा बंदोबस्त होता त्याप्रमाणेच यंदाही पोलीस बंदोबस्त असणार आहे.