महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जून । कोरोनाने गेल्या वर्षी इटलीमध्ये थैमान घातल्यानंतर मागील अनेक पिढ्यांनी पाहिली नसेल अशी भयंकर स्थिती इटलीमध्ये निर्माण झाली होती. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये होती. त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे. २८ जूनपासून इटलीमध्ये, मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने कोरोनावर मात करत मास्कपासून मुक्तता मिळवली आहे. सोमवारी ही माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. व्हायरस किती वेगाने पसरत आहे, याबद्दल आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी फेसबुकवर लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे. यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नसल्याचे म्हटले आहे.
देशाच्या वर्गीकरण प्रणालीमध्ये वायव्येकडील एओस्टा व्हॅली वगळता सर्व इटालियन प्रदेश समाविष्ट आहेत. रॉबर्टो स्पेरन्झा यांनी ही घोषणा इटलीच्या कोमिटाटो टेकनिको सायंटिफो (सीटीएस) वैज्ञानिक सल्लागार पॅनेलच्या सल्ल्यानुसार केली. ज्या ठिकाणी व्हायरसचा वेगवान प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे, अशा ठिकाणी लोकांना सध्या मास्क लावणे अनिवार्य नसणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याची आवश्यकता असू शकते. जगातील अनेक देशांत असेच निर्णय घेण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.