सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल ; CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी परीक्षा रद्दच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जून । कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला होता. पण, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा जर ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डाचा निर्णय योग्यच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, न्यायालयाने यावेळी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका देखील फेटाळून लावली.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश मागहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही याचिका अंशुल गुप्ता नामक व्यक्तीने दाखल केली होती. त्याशिवाय, उत्तर प्रदेश शिक्षक संघटनेने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी दोन्ही बोर्डांकडून स्वीकारण्यात आलेल्या पद्धतीला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका देखील यावेळी फेटाळून लावली.

दरम्यान, यावेळी न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे नमूद केले. आम्हाला असे वाटते की CBSE आणि ICSE या दोन्ही बोर्डांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. हा निर्णय घेताना सर्व विद्यार्थ्यांचे हित विचारात घेण्यात आले आहे. उच्च स्तरावर विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर घटकांचा विचार करून केंद्र सरकार आणि सीबीएसई-आयसीएसई बोर्डांकडून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्यावर निर्णय देणार नसल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले.

फक्त इतर संस्था परीक्षा घेऊ शकतात म्हणून बोर्डाने देखील परीक्षा घ्यायला हवी, हा दावा मान्य करता येणार नाही. व्यापक जनहिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईने १३ तज्ज्ञांच्या समितीमार्फत हा निर्णय घेतला असल्याचे देखील न्यायालयाने नमूद केले.

मूल्यमापनाच्या पद्धतीनुसार, तीन प्रकारचे गुण यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा त्यामध्ये समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि प्रिलियम परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील. दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *