नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे-छावा स्वराज्य सेनेची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

 132 total views

 

 

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली सर्वानुमते मागणी

महाराष्ट्र 24 । पुणे । विशेष प्रतिनिधी।

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. येथील स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे. तर, राज्य सरकारच्या पातळीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता छावा स्वराज्य सेनाही आक्रमक झाली असून, संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे देण्यात आले. या संदर्भात छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सर्वानुमते ही मागणी करण्यात आली.

यावेळी बैठकीला छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष अरिफ शेख, महिला प्रदेश अध्यक्षा शीतल हुलवळे, ठाणे जिल्हाध्यक्ष दीपक शेलार, नागेश,जाधव, अॅड. सुषमा यादव, मीना ठुले, पुजा कांबळे, सौरभ सगर, गणेश कांबळे, अनिकेत बेलगावकर, सुशांत जाधव, बॉबी शेलार आदी उपस्थित होते.

‘कोणतंही विमानतळ उभं राहताना शक्यतो शहराबाहेरची जागा निवडली जाते. तेव्हाच्या मुंबईच्या सीमेनुसार मुंबईतील विमानतळ सांताक्रूझला गेलं. कालांतरानं ते वाढत सहारपर्यंत गेलं. नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी होऊन स्थानिक ठिकाणांच्या नावाने ती विमानतळं ओळखली जाऊ लागली. आता नवी मुंबईत होणारे विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यामुळे त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असायला हवे. अशी भूमिका छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र 24 शी बोलताना स्पष्ट केली.

‘विमानतळाच्या नावाचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला गेलाय की नाही माहीत नाही. पण आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल बोलतोय याचे भान राजकीय नेत्यांना आपल्याला असायला हवे. ‘विमानतळांचं नामकरण करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आहेच. बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय आहेत. रायगडचे दिवंगत खासदार दि. बा. पाटील हे ज्येष्ठ नेते होते. दोन्ही नेत्यांच्या मोठेपणाबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु, नवी मुंबई विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव योग्य वाटतं,’ असं घायतिडक पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *