दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार : दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार ; सुनील केदार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुधाचं दर कमी झाल्यानं संकट कोसळलं आहे. राज्यातील विविध संघटनांनी दूध दर वाढवण्यात यावा म्हणून आंदोलन देखील केलं होतं. दुधाचे दर कमी झाल्यानं शेतकरी संघटना, विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्यानंतर दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. (Sunil Kedar Dairy Development Minister said we will make act for milk rate regulation)

दुधाच्या दराच्या संदर्भात आज वेगवेगळ्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ऊसाप्रमाणे दुधाला एफआरपीप्रमाणेच भाव मिळावा यासाठी कायदा करण्याच ठरलं आहे. त्यासंदर्भात लवकरच कायदा केला जाईल. जेणेकरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसू शकणार नाही.

ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. 25 रुपये लिटर दूध अशी मागणी असली तरी सुद्धा दुधाच्या किमती बाबत वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असंही सुनील केदार म्हणाले. लॉकडाऊनमुळे अनेक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. त्यादृष्टीने दिलासा द्यायचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *