महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आज शुक्रवारी चार वाजता विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बोर्डाच्या परिक्षा रद्द केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच मूल्यांकन प्रक्रिया स्विकारल्याबाबत सुप्रीम कोर्टाचे देखील आभार मानले आहेत.
निशंक यांनी पुढे म्हटलंय की, इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने केलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील लाभ होईल. जे विद्यार्थी या मूल्यांकनावर समाधानी नसतील त्यांना परीक्षेमध्ये बसण्याची संधी दिली जाईल.
यासंदर्भात ते म्हणाले की, जर मूल्यांकन पद्धती तुमच्या क्षमतांना न्याय देत नाहीये असं वाटत असेल तरी देखील निश्चिंत रहा. आम्ही आपली ही चिंता जाणतो. CBSE ऑगस्ट महिन्यात आपल्यासाठी बोर्डाची परीक्षा आयोजित करणार आहे. तुमचं आरोग्य आणि भविष्य याची आम्हाला काळजी आहे.
याआधी त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की, मला तुमचे अनेक मॅसेज आणि माहिती सतत मिळत आहे. या मॅसेजेसमधून काही शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत. आपल्याकडे सीबीएसई परीक्षेशी संबंधित इतर काही शंका असल्यास आपण मला ट्विटर, फेसबुकवर किंवा मेलद्वारे देखील पाठवू शकता,असं आवाहन त्यांनी केलं होतं.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)बारावीची परीक्षा रद्द (Twelth exam Canceled) केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि त्यातून मिळणाऱ्या गुण त्यावर समाधान होणार नाही, अशा विद्यार्थ्याची सीबीएसईने ऑगस्ट मध्ये ऑप्शनल परीक्षा (Optional Exam)घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होतील,अशी माहिती सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्रात दिली असल्याचे सांगण्यात आलंय.
बारावीचे मूल्यांकन आणि त्यासाठी मंडळाकडून कामकाज सुरू असून त्याप्रमाणे 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. यानंतर सीबीएसईकडून आपल्या निकालावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा पुरवली जाईल, अशी माहितीही मंडळाकडून देण्यात आली. ही ऑप्शनल परीक्षा केवळ मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उमेदवाराने मिळविलेले गुण अंतिम मानले जातील. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.