महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसतानाच तिसऱया लाटेबाबत घबराट व्यक्त केली जात आहे. त्यातच कोरोनाचा नवा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱया लाटेसारखी भयानक नसेल असा दावा ‘आयसीएमआर’ने केल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून तिसऱया लाटेबाबत अनेक नोंदी व्यक्त केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतिमान केल्यास कोरोनाच्या तिसऱया लाटेवर नियंत्रण येऊ शकते, असे आयसीएमआरने म्हटले आहे. लसीकरणानंतर बहुसंख्य लोक कोरोनाच्या तिसऱया लाटेचा समर्थपणे सामना करू शकतात, असे सदर अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. साहजिकच नवे बाधित आणि मृत्यूंची संख्या रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळू शकते. तथापि, कोरोनाचा संसर्ग होऊन कोरोनामुक्त झालेल्या लोकांमधील रोगप्रतिकारकक्षमता कमी झाल्यामुळे त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.