युरो चषक फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोवरच लक्ष केंद्रित करणार नसल्याचा प्रतिस्पर्ध्यांचा दावा, बेल्जियमच्या आशाअपेक्षा रोमेलू लुकाकूवर अवलंबून

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जून । युरो चषक स्पर्धेतील सर्वोत्तम उपउपांत्यपूर्व लढतीपैकी एक बेल्जियम-पोर्तुगाल यांच्यातील जुगलबंदीकडे आज अवघ्या फुटबॉल विश्वाचे लक्ष असणार आहे. एकीकडे, पोर्तुगाल संघात रोनाल्डोसारखा बहरातील सुपरस्टार तर दुसरीकडे, बेल्जियमकडे कोणत्याही क्षणी चमत्कार घडवण्याची क्षमता असणारा रोमेलू लुकाकूसारखा दिग्गज खेळाडू असल्याने या लढतीत कोणाची सरशी होणार, याचे विशेष औत्सुक्य असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 12.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.

सध्या ख्रिस्तियानो रोनाल्डो व रोमेलू लुकाकू हे दोन्ही खेळाडू अतिशय उत्तम बहरात आहेत. एकीकडे, रोमेलू लुकाकूने साखळी फेरीत 3 वेळा गोलजाळय़ांचा अचूक वेध घेतला आहे तर दुसरीकडे, रोनोल्डाने त्यापेक्षा सरस कामगिरी साकारत साखळीतील 3 सामन्यात तब्बल 5 वेळा प्रतिस्पर्धी गोलरक्षकांना चकवे दिले आहेत.

बेल्जियमचा केव्हिन डे ब्रुएन स्पर्धा सुरु झाल्यानंतर बऱयापैकी मैदानावर दिसून आला असून सध्या तो पूर्ण तंदुरुस्त आहे. या लढतीत तो ऍक्सेल वित्सेलच्या साथीने मिडफिल्डमध्ये दिसून येऊ शकेल.

थॉमस म्युनेरचे स्टार्टिंग इलेव्हनमधील स्थान निश्चित मानले जाते तर थॉर्गन हॅझर्ड देखील पुनरागमनासाठी सज्ज आहे. यातील काही खेळाडू स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयोजित सराव शिबिरात बेल्जियम पथकात समाविष्ट नव्हते.

पोर्तुगालही उत्तम बहरात

पोर्तुगाल संघातर्फे रेनॅटो सँचेसने फ्रान्सविरुद्ध उत्तम खेळ साकारला होता. त्यामुळे, तो पोर्तुगीज प्रशिक्षक सॅन्टोस यांच्या गेमप्लॅनमध्ये प्राधान्याने समाविष्ट असण्याची शक्यता अधिक आहे. विल्यम कार्व्हालो देखील शर्यतीत असणार आहे.

आपल्या वैयक्तिक कारकिर्दीतील 110 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याच्या महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरणारा रोनाल्डो बेल्जियमसाठी सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी असेल. मात्र, आपला फोकस फक्त रोनाल्डोवरच नसेल, असा दावा तूर्तास बेल्जियमच्या संघव्यवस्थापनाने केला आहे.

रोनाल्डो सध्या 3 सामन्यात 5 गोलांसह स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱया खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे आणि येथे देखील तोच फॉर्म आणखी एकदा प्रत्यक्षात साकारत संघाला विजय काबीज करुन देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पोर्तुगालचा संघ विद्यमान विजेता असल्याने यामुळे देखील त्यांचे मनोबल उंचावलेले असू शकते. 36 वर्षीय रोनोल्डो माजी इराणी स्ट्रायकर अली दई यांच्या 109 आंतरराष्ट्रीय गोलाच्या विक्रमाशी बरोबरीत असून येथे नवा विक्रम आपल्या खात्यावर प्रस्थापित करण्याचा साहजिकच त्याचा प्रयत्न असणार आहे.

क्रोएशियाविरुद्ध सहज बाजी मारण्याचे स्पॅनिश इरादे!

युरो स्पर्धेतील आज होणाऱया पहिल्या उपउपांत्यपूर्व लढतीत स्पेन व क्रोएशिया हे संघ आमनेसामने भिडत असून क्रोएशियाला सहज मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्याचे स्पॅनिश इरादे सफल होणार का, हे येथे स्पष्ट होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 9.30 वाजता ही लढत खेळवली जाणार आहे.

वास्तविक, स्पेन संघाने यंदा युरो स्पर्धेत अतिशय ‘स्लो स्टार्ट’ नोंदवला. या संघाला सलामी लढतीत स्वीडनने गोलशून्य तर दुसऱया साखळी लढतीत पोलंडने 1-1 बरोबरीत राखत सर्वांनाच आश्चर्याचे धक्के दिले. मात्र, तिसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात स्पेनने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारत स्लोव्हाकियाचा चक्क 5-0 असा एकतर्फी फडशा पाडला आणि आजही उपउपांत्यपूर्व लढतीत तोच धडाका येथे क्रोएशियाविरुद्ध देखील कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. स्लोव्हाकियाला एकतर्फी मात दिल्यानंतर साखळी फेरीअखेर स्पेनने दुसरे स्थान संपादन केले. स्वीडनचा संघ या गटात अव्वलस्थानी विराजमान राहिला.

आजच्या लढतीत स्पॅनिश संघात सेझर ऍझप्लिक्युटा दुखापतीमुळे उपलब्ध असणार की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, तो तंदुरुस्त असल्यास मागील विजयी संघात काहीही बदल केले जाणार नाहीत, असे संकेत आहेत. असे झाल्यास फेरान टोरेस व थियागो यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरावे लागू शकते.

क्रोएशियाची मॉड्रिकवर भिस्त दुसरीकडे, क्रोएशियाला देखील बाद फेरीतील पात्रता संपादन करण्यासाठी अगदी शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली आहे. पहिल्या 2 सामन्यात केवळ एकच गुण मिळवला असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, स्कॉटलंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात ल्युका मॉड्रिकच्या मास्टरक्लास खेळीमुळे त्यांनी सहज विजय संपादन केला व गटात दुसरे स्थान काबीज करत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *