पुण्यापासून या मार्गांवरील रेल्वे वाहतूक जुलैपासून होणार सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । देशाच्या विविध भागांतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे रेल्वेने अनेक मार्गांवरील गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यापासून सुटणाऱ्या प्रमुख सात मार्गांवरील वाहतूक १ जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे.

कोरोनाच्या लॉकडॉऊनमुळे अनेक गाड्या गेल्या दोन महिन्यांत बंद करण्यात आल्या होत्या. तसेच टप्प्‍याटप्प्याने त्यांची वारंवारिताही कमी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता काही मार्गांवरील वाहतूक सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार नागपूर मार्गावर रेल्वेने तीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अहमदाबाद, काझीपेठ, मुंबई, कोल्हापूर- नागपूर, अमरावती आदी मार्गांवरील रेल्वे वाहतूक आता पूर्ववत करण्यात येत आहे. प्रवासी संख्या वाढेल त्या प्रमाणात गाड्यांच्या संख्येत वाढ होईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच या मार्गांवर पुण्यावरून सुटणाऱ्या आणि परतीच्या गाड्यांचेही आरक्षण खुले झाले आहे. काही गाड्या आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सुटणार आहेत. त्यांची माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याची माहिती घेऊन प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे.

केवळ कन्फर्म तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेगाड्यांत प्रवेश मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. एनटीईएस या ॲपवरूनही रेल्वेची तिकिटे आणि आरक्षण प्रवाशांना उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. मास्कशिवाय प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रवाशांनी प्रवास करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे – अहमदाबाद एक्स्प्रेस १ जुलैपासून

पुणे- मुंबई एक्स्प्रेस १ जुलैपासून

कोल्हापूर – नागपूर २ जुलैपासून

पुणे- नागपूर एक्सप्रेस ४ जुलैपासून

पुणे- अमरावती एक्सप्रेस ७ जुलैपासून

पुणे – काझीपेठ ९ जुलै

पुणे – अजनी एक्सप्रेस १० जुलैपासून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *