24 तासांत एकही नवीन रुग्ण नाही, मृत्यू नाही ; नांदेडची वाटचाल कोरोनामुक्तीकडे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । दीड वर्षापासून कोरोनाच्या मगरमिठीत अडकलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी मोकळा श्वास घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेले कठोर परिश्रम, नागरिकांनी त्याला मनापासून दिलेला प्रतिसाद यामुळेच गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही आणि कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

तब्बल 16 महिन्यांपासून नांदेड कोरोनाच्या कराल दाढेत गुदमरले होते. दररोज आढळणारे रुग्ण, मृत्यूचा वाढणारा आकडा यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. बाजारपेठा बंद असल्यामुळे व्यापारीही चिंताक्रांत होते. परंतु जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कोरोनाचा मोठ्या हिमतीने मुकाबला केला. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. व्यापाऱ्यांनीही कडक निर्बंधांचे पालन करून संयमाचे दर्शन घडवले. परिणामी कोरोना नियंत्रणात आला. गेल्या 24 तासांत आरोग्य विभागाने 1492 अहवाल तपासले. त्यापैकी 1476 अहवाल निगेटिव्ह आले. एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दीड वर्षात प्रथमच नवे रुग्ण व मृत्यूचा आकडा शून्यावर आला.

बीड जिल्हयात मात्र रुग्णसंख्या अजूनही नियंत्रणात आलेली नाही. येथे दिवसभरात 170 नवे रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्हयात 29 नवे रुग्ण सापडले असून, दोन जणांचा मृत्यू झाला तर परभणी जिल्हयात 25 रुग्ण सापडले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. धाराशिव जिल्हयात 53, हिंगोली जिल्ह्यात 5 तर जालना जिल्ह्यात 11 नवे रुग्ण आढळले. जालन्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. धाराशिव, हिंगोलीत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. संभाजीनगर जिल्हयात 40 नवे रुग्ण आढळले तर दोन जणांचा मृत्यू झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *