महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । तळेगाव । मावळ तालुक्यातील सोमाटणे टोलनाका येथे स्थानिक नागरिकांना थांबवून त्यांच्याकडून टोलवसुली केली जात आहे. ही टोलवसुली तात्काळ थांबवा अशी मागणी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी केली आहे. या करिता त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ञ प्रविण वाटेगावकर यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुख् सचिव महाराष्ट्र शासन, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांना नोटीस ही पाठवली आहे.
मावळ तालुक्यातील सर्व वाहनांना सोमाटणे टोलनाका येथे सुट मिळावी, याकरिता एकवीस फेब्रुवारी रोजी सोमाटणे टोलनाका येथे सर्वपक्षीय आंदोलन केले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने कोविड काळात आंदोलन न करता चर्चेतून विषय सोडविण्याची विनंती केली होती. यानुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भास्करराव जाधव यांच्या समक्ष एमएसआरडीसीचे अधिकारी दिलीप शंकरराव व आयआरबीचे अधिकारी यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक ही झाली होती. याबैठकीत मावळातील स्थानिकांसाठी सोमाटणे टोलनाका स्थानिकांना टोलमुक्त करण्याचा निर्णय झाला.
महिनाभर या निर्णयाप्रमाणे स्थानिकांना प्रत्यक्ष टोलमाफी देण्यात आली. मार्च नंतर मात्र पुन्हा स्थानिकांना टोलसाठी अडवणूक सुरू झाली. लोणावळा, वरसोली, तळेगाव भागातील अनेक नागरिकांच्या तक्रारी येऊनही टोल सुरूच आहे. दरम्यान टोलमाफीचा जीआर आम्हाला मिळाला नाही त्यामुळे टोल सुरू ठेवला असे अधिकारी सांगतात.
वास्तविक पाहता दोन टोल नाक्यांमधील अंतर पस्त्तीस किमी पेक्षा जास्त असावे असा नियम असताना वरसोली व सोमाटणे हे टोलनाके तीस किमी अंतराच्या आतमध्ये येत असल्याने यापैकी एक टोलनाका बेकायदेशीर आहे अस स्पष्ट होतेय. मागील पंधरा वर्ष मावळातील नागरिकांची फसवणूक करत याठिकाणी राजरोसपणे टोलवसुली सुरू होती असा आरोप किशोर आवारे यांनी केला आहे. याकरिता सोमाटणे येथील सदर बेकायदेशीर टोलनाका देहुरोडच्या पुढे हालवावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे..