मान्सून रेंगाळताच उत्तर भारतात पारा चढला, दिल्लीत तापमान 44 अंशांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । पावसाचा हंगाम आहे, मात्र थेंब रुसले आहेत. मान्सूनच्या सुरुवातीच्या शिडकाव्याने जो दिलासा मिळाला होता तो उष्ण हवेने उडून गेला. उत्तर भारतातील शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा ७ अंश जास्त आहे. दिल्लीत गुरुवारी पारा ४४ अंश होता, जो या दिवसात ३७-३८ अंश असतो. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, चंदीगड व पश्चिम यूपीचा भाग तीन दिवसांपासून उष्णतेच्या तावडीत आहे. या भागात अजून मान्सूनचे आगमन झालेले नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील आकाशात मान्सूनचे वारे दोन आठवड्यांपासून रोखून धरले आहेत. केरळमध्ये दोन दिवस उशिरा आलेला मान्सून इतक्या वेगाने पुढे सरकला की १० दिवसांतच देशाच्या ८०% भागात पोहोचला, मात्र आता थांबला आहे.

हवामान खात्याचे म्हणणे आहे की, ३ जुलैपासून अरबी समुद्रातून दमट वारे गुजरात, राजस्थान व दिल्लीत पोहोचतील तेव्हा उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, मान्सूनचा व्यत्यय ७ जुलैपर्यंत राहू शकतो. यानंतर बंगालच्या खाडीतून येणारे वारे उत्तर भारतात पोहोचतील व मान्सून पुन्हा सक्रिय होईल. ११-१२ जुलैला बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टाही तयार होईल, यामुळे कमकुवत झालेल्या मान्सूनला बळ येईल. मात्र तोपर्यंत थोडा उशीर झालेला असेल. कारण, सामान्यपणे ८ जुलैपर्यंत पूर्ण देश व्यापणाऱ्या मान्सूनला या वेळी एक आठवडा जास्त लागू शकतो.

पंजाब-हरियाणा-राजस्थानात सलग पश्चिमी विक्षोभ आहे. यामुळे मान्सूनच्या उत्तर सीमेवरील पूर्व बाजू १३ जून आणि पश्चिमेकडील बाजू १९ जूनपर्यंत ज्या ठिकाणी होती तेथेच अडकली आहे. सात दिवस ही वाटचाल होण्याची शक्यता नाही.

साधारणपणे मान्सूनची विश्रांती एवढी दीर्घकाळ नसते
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, मान्सूनची वाटचाल नेहमी सारखी नसते. दरवर्षी मान्सून मध्येच ५-६ दिवस विश्रांती घेतो. मात्र, काही वर्षांत १०-१२ दिवसांचाही विक्रम आहे. या वर्षी मात्र हा कालावधी नेहमीपेक्षा अधिक आहे.

ही स्थिती… दिल्ली-हरियाणात दिवसाचे तापमान ४३-४४ अंश, सर्वसाधारणपणे असते ३६-३७ अंश
कारण… मान्सून १४ दिवस प. उत्तर प्रदेश, द. राजस्थानात अडकला, त्यामुळे उष्णता पुन्हा वाढली
पुढे… ७ जुलैपर्यंत मान्सूनची वाटचाल होण्याची चिन्हे नाहीत, तोपर्यंत उत्तर भारतात उकाडा राहणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *