राज्यात पावसाची दडी; शेतकऱ्यांची चिंता वाढली , शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जुलै । राज्यात मान्सूनचं (Monsoon) जोरदार आगमन झालं. काही ठिकाणी जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र पूर्ण राज्यात मान्सून पोहोचण्याआधीच त्याच्या प्रवासात खंड (Break) पडला आहे. त्यात यंदा मान्सून सरासरीएवढा होईल. तसंच जून आणि जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार निम्म्याहून जास्त महाराष्ट्रात (Maharashtra) तसा पाऊस झाला. मात्र राज्यातल्या काही जिल्ह्यात दुष्काळसदृश्य (Drought) परिस्थिती निर्माण झाल्यानं चिंता वाढली आहे. राज्यात मान्सूनचा प्रवास अर्ध्या वाटेतच थांबल्यानं शेतकऱ्यांसाठी (Farmers) चिंतेची बाब ठरली आहे.

सद्यपरिस्थिती राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निमार्ण झाली आहे. नंदुरबारमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी तर अकोला, धुळे आणि या नाशिक या जिल्ह्यांत 25 ते 50 टक्के कमी पाऊस झाला. या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पीक वाढ होण्याच्या वेळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून खंड दिल्याने उगवून आलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. खरीप पेरण्यांचाही खोळंबा झाला आहे.

राज्यातल्या 355 तालुक्यांपैकी एका तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी, 9 तालुक्यात 25 ते 50 टक्के, 25 तालुक्यात 50 ते 75 टक्के, 34 तालुक्यात 75 ते 100 टक्क्यांदरम्यान तर उर्वरित 286 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं तिथेही गंभीर स्थिती आहे.

30 जूनपर्यंत दिल्ली, पंजाब आणि चंदीगडच्या काही भागांचा अपवाद वगळता देशात बहुतांश ठिकाणी मान्सून पोहोचला आहे. साधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सूननं पूर्ण देश कवेत घेतल्याचं चित्र असतं. मात्र यावेळी हे चित्र दिसण्यासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर्ण देशात मान्सूच्या 4 महिन्यात सरासरी 880.6 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा 907 मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या थोडा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या संस्थेनं वर्तवला आहे. या ब्रेकमुळे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अगोदरच कोरोना संकटातून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला यामुळे अधिकच फटका बसण्याची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *