महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली. परंतु या ‘अनलॉक’चा नागरिक गैरफायदा घेऊ लागले आहेत. पर्यटनस्थळे आणि बाजार गर्दीने गजबजले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रस्त्यांवर ट्रफिक जॅम होऊ लागले आहे. ही परिस्थिती पाहून केंद्र सरकार चिंतेत पडले आहे. नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी कोरोना परिस्थितीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा दिला. ‘कोरोनाची दुसरी लाट अजूनही मर्यादित स्वरूपात कायम आहे. पर्यटनस्थळांवर मोठय़ा संख्येने गर्दी दिसू लागली आहे. असे करणे म्हणजे आजवरचे आपले प्रयत्न फोल घालवण्यासारखे आहे. कोरोना नियमावलीचे पालन करायला हवे,’ असे अग्रवाल यावेळी म्हणाले.
देशात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या 73 जिह्यांना आणि संबंधित राज्य सरकारांनाही आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवले आहे. या जिह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. भार्गव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, तामीळनाडू, केरळ, ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तिसरी लाट कशी असेल त्याचे अंदाज बांधण्यापेक्षा आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधांचे आणि नियमावलीचे पालन केले पाहिजे, असा सल्ला डॉ. भार्गव यांनी दिला आहे.