महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी मूर्ती तयार करून विकणाऱया मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरूपाचे मंडप उभारण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऑफलाइन परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. ही परवानगी मूर्ती तयार करून विकाणाऱया मूर्तिकारांनाच देण्यात येणार असून केवळ मूर्ती विकण्यासाठी मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येणार नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मूर्तिकारांना मंडपाच्या परवानगीबाबतच्या शुल्काबाबत त्या त्या प्रभाग कार्यालयात परिपत्रक काढण्यात आल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय पालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. https://portal.mcgm.gov.in या लिंकवरून ही माहितीही मिळू शकते. त्यामुळे संबंधितांनी पालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱया सूचना पाळून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.