कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपुरात दाखल भाविकांना बाहेर काढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही आषाढी यात्रा प्रातिनिधिक व मर्यादित स्वरूपात होणार आहे. त्या कालावधीत 17 ते 25 जुलै संचारबंदी असल्याने आतापासूनच काही भाविक, वारकरी दाखल झाले आहेत. त्या सर्वांना शोधून शहराबाहेर काढणार असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. यासंदर्भात शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळा, लॉजना नोटिसा बजावल्याचे त्यांनी सांगितले.आषाढीवारीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासन व पोलिस यंत्रणेची नियोजनासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी विविध सूचना दिल्या.

यासंदर्भात सातपुते म्हणाल्या, सध्या कोरोनाची साथ अजूनही कायम आहे. त्यामुळे शासनानेच सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीसंदर्भातही नियम, निकष ठरले आहेत. त्यामध्ये मानाच्या पालख्याव्यतिरिक्त इतरांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. मानाच्या 10 पालखी सोहळ्यातील 400 भाविक आणि 195 मठाधिपती यांना शासनाने शहरात थांबण्याची परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे आषाढी यात्रा काळात यंदाही 17 ते 25 जुलै पर्यंत 9 दिवस संचारबंदी लागू केली आहे. असे असताना काही भाविक त्यापूर्वीच पंढरपूर मध्ये विविध मठात येऊन दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

अजूनही पंढरपूरमध्ये कोरोनाचे संकट संपलेले नसल्याने भाविकांच्या आरोग्यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलले जाणार आहे. आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा स्नानालाही बंदी घालण्यात आलेली असल्याने ज्यांना परवानगी दिलेली आहे, असेच भाविक चंद्रभागेपर्यंत पोचू शकणार आहेत. सोलापूर जिल्ह्यापासून पंढरपूर शहरापर्यंत त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकही परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही. त्यासाठीच आतापासूनच पंढरपूरात दाखल झालेल्या अशा भाविकांना बाहेर काढण्यात येणार आहे. याकरीता पोलीसांनी सर्व मठ आणि धर्मशाळांना नोटीसा बजावल्या आहेत.

आषाढी बंदोबस्तासाठी येणार्‍या सर्व अधिकारी कर्मचारी हे शक्यतो दोन लस घेतलेले असावेत, अशी तयारी केली आहे. प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. याशिवाय बंदोबस्ताला येणार्‍या प्रत्येक कर्मचारी अधिकार्‍याला कोरोना किट दिले जाणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. आषाढीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापूजेला येणार असल्याने मंदिरात पूजेच्यावेळी कमीत कमी उपस्थितीबाबत प्रस्ताव शासनाला दिला आहे.

यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अरविंद माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गुंड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *