या तरुणाच्या अनोख्या स्टार्टअपची होतेय चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । ठराविक कालावधीनंतर त्याच त्याच जीन्स वापरण्याचा कंटाळा येतो. जुन्या जीन्स वर्षानुवर्षे कपाटात तशाच पडून राहतात. मात्र आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने अनोखा स्टार्टअप सुरू केला आहे. महिन्याला साधारण एक हजार जुन्या जिन्सचा पुनर्वापर करून तो 400हून अधिक प्रकारच्या वस्तू तयार करतो.

दिल्लीत वास्तव्यास असलेला सिद्धांत कुमार याने आयआयटी मुंबईमधून मास्टर्स इन डिजाईन पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने काही काळ बंगळुरूमध्ये नोकरी केली. नोकरीत त्याचे मन रमत नव्हते. काहीतरी वेगळं करण्याची त्याची इच्छा होती. 2012 साली तो दिल्लीत परतला. तिथे त्याने डेनिम डेकोर नावाचा स्टार्टअप सुरू केला.

स्टार्टअपची कल्पना कशी सुचली याबाबत तो म्हणाला, मी दिल्लीत भाडय़ाच्या घरात राहायचे. घराच्या भिंतीची अवस्था फारशी चांगली नव्हती. या खराब भिंती लपवण्यासाठी मी जुन्या जीन्सचा कल्पकतेने वापर केला. घरी येणारा प्रत्येक जण माझ्या आयडियाचे कौतुक करायचा. त्यातूनच बिझनेसची आयडिया मला सुचली.

सुरुवातीला सिद्धांतने जुने फोन, दिवे, किटली अशा अँटीक वस्तू खरेदी केल्या. डेनिम जीन्सने त्यांना सजवत नवीन लूक दिला. आधी त्याने अशा 40 ते 50 वस्तू तयार केल्या आणि त्याचे प्रदर्शन एका मॉलमध्ये भरवले. या वस्तू हातोहात विकल्यानंतर त्याला प्रोत्साहन मिळाले. सुरुवातीच्या काळात त्याने मित्रांकडून जुन्या जीन्स मिळवल्या. स्टार्टअप सुरू केल्यानंतर भांडीवाल्यांकडून जीन्स घ्यायला सुरुवात केली. आता तो बॅग, डायरी, पेन, शोभेच्या वस्तू, चप्पल अशा तब्बल 400 प्रकारच्या वस्तू बनवतो. कोरोना काळात त्याने डेनिम मास्क बनवले आणि 40 लोकांना रोजगार दिला. परदेशातूनही त्याच्या उत्पादनांना मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *