महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । गोकुळ दूध उत्पादक संघाने म्हशीच्या आणि गाईच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय आज घेतला. म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची तर गाईच्या दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ होणार आहे तर विक्री दरात 2 रुपयांची वाढ होणार आहे. रविवार, 11 जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
कोल्हापूर येथे संघाचे नेते सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. खरेदी दराबरोबरच विक्री दरातही दोन रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई-पुण्यातही दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका मुंबईकर आणि पुणेकरांनाही बसणार आहे, मात्र कोल्हापूर, सांगली आणि कोकणात ही दरवाढ लागू होणार नाही. कोरोना काळात ही दरवाढ होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे तर सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. दरम्यान, भूमिहीन शेतकऱयांना जिल्हा बँकेच्या वतीने म्हैस खरेदीसाठी विनातारण कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.