आरटीई : आरटीईच्या फक्त 50 टक्केच जागा भरल्या, 23 जुलैपर्यंत प्रवेशास मुभा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अत्यंत मंदगतीने सुरू आहे. प्रवेशांसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतीत जेमतेम ५० टक्केच प्रवेश निश्चित झाले असून प्रवेशांसाठी आता पुन्हा दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता २३ जुलैपर्यंत पालकांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर माेफत प्रवेश देण्यात येतो. आरटीईअंतर्गत राज्यात ९ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा यंदा उपलब्ध आहेत. शिक्षण विभागाने मार्चमध्ये जाहीर केलेल्या सोडतीमध्ये ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर केले होते. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करून ११ ते ३० जूनदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या मुदतीत ३६ हजार ४४५ विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले होते, तर २३ हजार २०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले. प्रवेशाची मंदावलेली गती पाहता प्रवेशांसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येत होती. ही मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देत २३ जुलैपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, या मुदतीनंतरही ५० टक्केच प्रवेश झाले असून उर्वरित ५० टक्के जागा १५ दिवसांत भरण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर असणार आहे. आतापर्यंत ४२ हजार ३८५ विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले आहेत, तर ४६ हजार १६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले आहे. सुरुवातीला कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि नंतर तांत्रिक अडचणींमुळे आरटीई प्रवेश कमी झाल्याचे कारण शिक्षण विभागातील अधिकारी देत आहेत. शासनाने खासगी शाळांना आरटीई प्रवेशाच्या परताव्यातील रक्कम कपात केल्याने आणि मागील परतावाच पूर्ण न दिल्याने शिक्षण संस्थांमध्ये नाराजी असून त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे. दरम्यान, या मुदवाढीमुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांच्या पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

अशी आहे आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेची स्थिती
औरंगाबाद : ३ हजार ६२५. त्यापैकी शुक्रवारपर्यंत १९०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
मुंबई : ५२२७. यापैकी १६८६ जागांवर प्रवेश झाले आहेत.
नाशिक : ४५४४ जागांपैकी २७०५ जागांवर प्रवेश झाले आहेत.
नागपूर : ५ हजार ७२९ जागा आहेत. यापैकी १ हजार ८८५ जागांवरच प्रवेश झाले आहेत.
जळगाव : ३ हजार ६५ जागांपैकी २ हजार १५१ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
पुणे : १४ हजार ७७३ जागा आहेत. त्यापैकी ७५७६ जागांवर प्रवेश झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *