आरोग्य विषयक : सतत जाणवणारा थकवा लोहयुक्त आहारामुळे कमी होऊ शकतो का?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । थकवा का जाणवतो याचं कोणतंही कारण प्रथमदर्शनी दिसत नाही.आपल्याला जाणवणाऱ्या थकव्याविषयी आपल्याला फार कमी गोष्टी माहिती आहेत. आता काही नवी संशोधनं थकवा आणि आहार यांचा संबंध  दाखवत आहेत.

अॅनिमिया म्हणजे शरीरातली लाल रक्तपेशींची कमतरता. या रक्तपेशी कमी असल्यास रक्तातून शरीरातल्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन वाहून नेला जाऊ शकत नाही. परिणामी थकवा येतो.तज्ज्ञांना वाटतं की आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला तरतरी येते, थकवा पळून जातो आणि तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. तुमचं हिमोग्लोबिन योग्य पातळीवर असलं आणि तुम्ही आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवलं तर याचा फायदा होतो.ज्यांना अॅनिमिया नाही अशांच्या शरीरातही लोहाची कमतरता असू शकते. तज्ज्ञांच्या मते अॅनिमिया असणाऱ्या लोकांच्या तुलनेत ज्यांना अॅनिमिया नाही पण ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे अशांचं प्रमाण तिप्पट आहे.ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि नॅशनल हेल्थ सर्व्हेच्या मते जननक्षम वयात असणाऱ्या महिलांना जाणवणाऱ्या थकव्याचं लक्षात न आलेलं कारण लोहाची कमतरता हेच आहे.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह असतं, त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. लाल मांसातही लोह असतं. C जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबासारख्या फळांचा आहारात समावेश हवा. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायला हवं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवावा कारण त्यांच्यात पुरेशी जीवनसत्त्वं असतात. प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं, साखरेचं अतिसेवन करू नये आणि दिवसभरात सतत खाण्यापेक्षा पोट भरून तीनदा व्यवस्थित जेवण करून अधेमध्ये खाणं टाळावं.

ड जीवनसत्त्वं : या ड जीवनसत्त्वाची म्हणजेच व्हिटॅमिन D ची कमतरता अनेकांमध्ये असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं किंवा सप्लिमेंटस् घेणं याने ही कमतरता दूर करता येऊ शकते.

B12 जीवनसत्त्वं : सगळ्याच प्रकारच्या वयोगटांमध्ये या जीवनसत्त्वाची कमतरता असते. थकवा हे या जीवनसत्त्वाच्या कमतरतेचं एक लक्षण आहे.

झिंक : 11 ते 18 वयोगटातल्या मुलांमध्ये झिंकची कमतरता असू शकते. पण यासाठी बाहेरची सप्लीमेंट्स घेताना सावधान कारण शरीरात झिंकचं प्रमाण वाढलं तर अॅनेमिया होऊ शकतो.

अ जीवनसत्त्वं : 11 ते 18 वयोगटातल्या मुलांमध्ये या अ जीवनसत्त्वाची म्हणजेच व्हिटॅमिन ए ची कमतरता आढळते.

डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. कदाचित या थकव्यामागे काही दुसरं गंभीर कारण असू शकतं. सप्लीमेंट, गोळ्या घेण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर विचारा कारण त्यांच्या अतिसेवनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *