पंढरपुरात उद्यापासून संचारबंदी, तर 400 वारकऱ्यांसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । उद्यापासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीला सुरुवात होत असल्यामुळे आज अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली आहे. या आषाढीला दर्शन व्हावे यासाठी हे भाविक नामदेव पायरीचे आणि कळसाचे बाहेरून दर्शन घेऊन परंतु लागले आहेत. उद्यापासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार असून शहरात केवळ दूध, औषधे आणि पेट्रोल, गॅस एवढीच सेवा सुरु राहणार असल्यामुळे नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली आहे. उद्या 18 जुलैपासून 25 जुलै पर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी असणार असून गोपाळपूर येथील संचारबंदी 24 तारखेला तर इतर 9 गावातील संचारबंदी 22 तारखेला संपणार आहे.

यंदाही कोरोनाच्या संकटात आषाढी एकादशी होत असताना केवळ 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असून इतर वारकऱ्यांनी प्रवेश करू नये, यासाठी तब्बल 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकारी यांची कोरोना चाचणी करूनच त्यांना बंदोबस्ताचे रिपोर्टिंग करू दिले जात असल्यामुळे एकही कोरोनाग्रस्त कर्मचारी बंदोबस्तात असणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे.

कालपासून बंदोबस्ताला आलेल्या 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यावर केवळ 5 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. हे कर्मचारी सोलापूर, सांगली आणि पुणे भागातील असून त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात हलविण्यात आलेले आहे. या पोलिसांना यात्रा काळात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी त्यांना कोरोना किट देण्यात आले असून यात मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, ग्लुकोन डी, पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट आणि खाण्यासाठी बिस्किटे आणि चिक्कीची पाकिटे देण्यात आलेली आहेत.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी यात्रा जरी भरणार नसली तरी मंदिर मात्र विविध रंगी दिव्याने झगमगून निघाले आहे. पुणे जिल्ह्यातील विनोद संपत जाधव या भक्ताने विठूरायाच्या राऊळी आकर्षक विद्युत रोषणाईने उजळवून टाकली आहे. मुळशी तालुक्यातील शिवदत्त डेकोरेटर्स कंपनीचे मालक विनोद जाधव यांनी सलग पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर ही सजावट साकार केली आहे.

विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली असून याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडप देखील या रोषणाईने उजळून गेला आहे. मंदिराच्या आतील बाजूस देखील आकर्षक रोषणाईस आता सुरुवात केली असून विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने एलईडी दिव्यांच्या माळा वापरून रोषणाई केली असून मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्यामुळे विठ्ठल मंदिराचे रुपडेच पालटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *