टक्केवारी वाढल्याने एकेका जागेसाठी ‘कांटे की टक्कर’ ; दहावीतील गुणांआधारे होणार आयटीआय प्रवेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । अकरावी प्रवेशासाठी सीईटीची अट असली तरी राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे दहावीतील गुणांआधारेच होणार आहेत. त्यामुळे यंदा आयटीआय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा रंगणार असून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने सरकारी तसेच खासगी आयटीआयमधील एकेका जागेसाठी ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. राज्यात आयटीआय प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गुरुवार, 15 जुलैपासूनच प्रवेशाच्या नोंदणीला सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण 967 आयटीआयमधील प्रवेशासाठी एकूण 1 लाख 49 हजार 296 जागा उपलब्ध आहेत. विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. आयटीआय संस्थांमध्ये एकूण 91 कोर्स उपलब्ध आहेत. त्यातील 80 कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण आणि 11 कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ही पात्रता आवश्यक आहे.

अकरावीत प्रवेशास इच्छुक नसलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा उत्तम पर्याय
दहावीत 60 ते 35 टक्क्यांपर्यंत 2 लाख 90 हजार 608 विद्यार्थी आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थी दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे डिप्लोमा किंवा आयटीआय अभ्यासक्रमांकडे वळतात. हे अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचेच असल्याने भविष्यात अल्पावधीतच विद्यार्थ्यांना नोकरीच्या अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *