आषाढी वारीची तयारी पूर्ण ; पंढरपुरात संचारबंदी,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदीला रविवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून 3 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांत संचारबंदीला सुरुवात झाली आहे. यामध्ये औषध दुकाने आणि दूध विव्रेते याशिवाय कोणालाही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पंढरपूरकडे येणारे सर्व 48 मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले असून, कोणालाही पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जात नाही. पोलिसांनी शहरातील 500 पेक्षा जास्त मठांची तपासणी करून संचारबंदीपूर्वी शहरात येऊन मठात राहिलेल्या वारकरी आणि भाविकांना परत पाठवले आहे.

पालख्यांसोबतच्या वारकऱयांनाच चंद्रभागेत जाण्याची परवानगी
कोरोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित स्वरूपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिलेला नाही. मात्र शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालखी सोहळय़ातील 400 वारकऱयांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे.

एसटीसह खासगी वाहतूक पूर्णपणे बंद
आषाढी एकादशीनिमित्त आजपासून 8 दिवसांची संचारबंदी लागू केल्याने एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आजपासून 25 जुलैपर्यंत आता एकही एसटी बस पंढरपूरमध्ये येणार नसून, एकही बस पंढरपूरमधून बाहेर पडणार नाही. खासगी वाहतूकही आता पुढील 8 दिवस बंद राहणार आहे.

माऊलींचा पालखी सोहळा आज पंढरीकडे मार्गस्थ होणार
आळंदी येथील माऊली मंदिरालगत असलेल्या गांधीवाडा दर्शनबारी सभागृहातील आजोळघरातून सतरा दिवसांचा पाहुणचार घेत आषाढी वारीकरिता माऊलींच्या चलपादुका उद्या सोमवारी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. चाळीस निवडक मानकरी, वारकऱयांसमवेत हा सोहळा शासनाच्या नियमांचे पालन करीत आकर्षक फुलांनी सजवलेल्या शिवशाही एसटी बसने सकाळी 9 वाजता मार्गस्थ होणार आहे.

‘श्रीं’च्या चलपादुका पंढरीला निघण्यापूर्वी मंदिरात पालखी सोहळ्याच्या परंपरेप्रमाणे सकाळी अभिषेक, दुधारतील, वाखरीतील मानाचे कीर्तन आळंदी मंदिरात होणार आहे.

पंढरपूरपर्यंत व परत येईपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. कोरोना नियमांचे पालन करीत वारीसाठी आळंदीतून दोन शिवशाही एसटी मार्गस्थ होणार आहेत. यासाठी एसटीचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असून, एसटीची फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. तसेच, रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात येत आहे. आजोळघर परिसरात ‘श्रीं’च्या सोहळ्यास निरोप देण्यास परंपरेने आळंदीकर भाविक उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *