मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली; नाणे मावळातील २५ गावांचा संपर्क तुटला

Spread the love

दूध व्यावसायिक, कामगार यांना पुलावर पाणी असल्याने पुन्हा घरी जावे लागले

महाराष्ट्र 24 । कामशेत । गणेश क्षीरसागर ।

गेल्या पाच दिवसांपासून कामशेत, नाणे मावळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. कामशेत व नाणे यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने २५ गावांतील नागरिकांचा शहरी भागाकडे येण्यासाठी संपर्क तुटला आहे. बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांना फटका बसला आहे. या भागातून ग्रामस्थ बाजारासाठी कामशेत येथे येतात. परंतु, दूध व्यावसायिक, कामगार यांना पुलावर पाणी असल्याने पुन्हा घरी जावे लागले. तर काहींनी जीव धोक्‍यात घालून पूल पार केला.

गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कामशेत, करंजगाव, गोवित्री, थोरण, जांभवली, सोमवडी, उकसान व अन्य गावात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागांत भातखाचरे नदी, नाले, ओढे पाण्याने भरून गेली आहेत. इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कामशेत व नाणेला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो.

कोरोनामुळे दोन वर्ष होत आले शाळा कॉलेजेस बंद आहेत. परंतु दरवर्षी विद्यार्थ्यांनाही पावसाळी त्रास होतो. दरवर्षी पावसाने नाणे मावळचा कामशेतला येण्याजाण्याचा मार्ग बंद होतो. इंद्रायणी नदी पाण्याची पातळी वाढल्याने कामशेत व नाणे यांना जोडणारा जुना पुल हा पाण्याखाली जातो. नवीन पूल असूनही त्या पुलाचा मात्र पावसाळी काही उपयोग होत नाही. कारण नाणे पुलासमोरील रस्ता सर्वत्र रस्त्यावर पाणी पसरले असते. त्यामुळे रस्ता पाण्याखाली जातो. मावळातील २५ गावांतील लोकांना कामशेतची बाजारपेठ आहे. तसेच कामशेतवरूनच कामगार पुणे व पिंपरी चिंचवड येथे कामाला जातात. येथील दूधवाले रोज दूध घेऊन पिंपरी-चिंचवडला जातात. रस्ता पाण्याखाली गेल्याने ह्या सर्व नागरिकांची गैरसोय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *