महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । व्हॉट्सअॅप (WhatsApp) हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या वाढत आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असते. युजर्सच्या गरजा, अपेक्षा आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन ही फीचर्स आणली जातात, त्यामुळे व्हॉट्सअॅपला नेहमीच मोठी पसंती मिळते. व्हॉट्सअॅपने ‘व्ह्यू वन्स’ (View Once) हे नवीन फीचर (Feature) आणलं आहे.
या फीचरमुळे युजरला पाठवण्यात आलेले फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) एकदा पाहिल्यानंतर ते आपोआप डिलीट (Delete) केले जातात. तसंच हे फोटो-व्हिडीओ ओपन केले नाहीत, तर 14 दिवसांनंतर ते आपोआप डिलीट होतात. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोच्या अहवालानुसार (WABetaInfo) कंपनीनं या फीचरला ‘एक्सपायर्ड व्ह्यू वन्स’ (Expired View Once) असं नाव दिलं आहे. सध्या हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.21.15.11 सह आणलं आहे. मात्र ते अजून सर्वांसाठी पूर्णतः कार्यान्वित झालेलं नाही. त्यामुळे सर्वच युजर्सला हे फीचर दिसत नाही. यात आणखी काही सुधारणा अपेक्षित असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.
सध्या हे फीचर इनेबल करून पाठवण्यात येणारे फोटो, व्हिडीओ ज्या व्यक्तीला ते पाठवण्यात आले आहेत त्या व्यक्तीने ते 14 दिवसांत पाहिले नाहीत, तर ते एक्सपायर्ड (Expired) म्हणून मार्क होत नाहीत. यावरच काम सुरू असून, येत्या काही दिवसांत यात अपडेट करण्यात येईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. ही सुधारणा झाल्यानंतर या फीचर अंतर्गत पाठवले जाणारे फोटो-व्हिडीओ बघितले नसल्यास ते 14 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील आणि फोटो एक्सपायर्ड (Photo Expired) किंवा व्हिडीओ एक्सपायर्ड (Video Expired) असं मार्क होईल, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
हे नवीन फीचर गेल्या वर्षी सुरु झालेल्या डिसअपियरिंग मेसेजसारखंच (Disappearing Message) असल्याचं मत युजर्सनी व्यक्त केलं आहे. डिसअपियरिंग मेसेज फीचरमध्ये 7 दिवसांनी मेसेजेस आपोआप डिलीट होतात, तर ‘व्ह्यू वन्स’ या फीचरमध्ये एकदा बघितलेला किंवा चौदा दिवसात न बघितले गेलेले फोटो किंवा व्हिडीओ आपोआप डिलीट होतात. यामुळे व्हॉट्सअॅप चॅटवर साठत जाणाऱ्या फोटो, व्हिडीओचा साठा आपोआप कमी होईल आणि फोनमधील मेमरी अधिक कार्यक्षमपणे वापरता येईल.