महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना घरातील भांडी, कपडे व साहित्य विकत घेण्यासाठी तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली.
पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पूरग्रस्त भागांतील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरू आहेत, पण तातडीची मदत म्हणून ही रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होईल. आपत्तीग्रस्तांना रोख रकमेचे वाटप केले तर अनेक आरोप होतात. पैशांचे योग्य वाटप झाले नाही तर गैरप्रकाराचे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही. म्हणून मदतीचे पैसे पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.