मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत GST भरूच नका ! ठाकरेच काय मोदीही तुमच्या दारात येऊन मागण्या पूर्ण करतील ; प्रल्हाद मोदींचे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । कोरोना आणि लॉकडाउनमुळे नुकसान झालेले व्यापारी आणि व्यावसायिक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जोरदार पाठिंबा दिला. आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका. आंदोलन तीव्र करा. मग, कुठलेही सरकार असो तुमच्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील असे प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.

मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका
प्रल्हाद मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधूच नव्हे, तर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात छोट्या आणि असंघटित व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत येत नाही. अशात ठाणे येथील व्यापाऱ्यांनी आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केले. उल्हासनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

ठाकरेंसह मोदीही मागण्या मान्य करतील
व्यापाऱ्यांशी संवाद साधताना प्रल्हाद मोदी म्हणाले, “व्यापाऱ्यांनी आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहावे, की आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरणार नाही. आम्ही लोकशाहीत जगतो गुलामगिरीत नाही.” आपले आंदोलन आणखी तीव्र करा. मग, मुख्यमंत्री असो की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणालाही तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या दारापर्यंत यावे लागेल.

देशभर लॉकडाउन आणि कोरोना काळात व्यापारी त्रस्त झाले. अशात अनेक दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात पेंडॅमिक एक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी दुकाने सील करण्यात आली आहेत. ठाणे येथील कार्यक्रमात उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी आपले म्हणणे प्रल्हाद मोदींसमोर मांडले. यावेळी बोलताना महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांवर झालेल्या कारवाया आणि गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी प्रल्हाद मोदी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *