(Ashes Series) मोठी बातमी! … तर इंग्लंडचे क्रिकेटपटू टाकणार अ‍ॅशेस मालिकेवर बहिष्कार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी प्रतिष्ठेची अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) संकटात सापडली आहे. ही सीरिज डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याची धास्ती घेतली आहे. याचे कारण ऑस्ट्रेलियन पिच किंवा खेळाडू नाही तर ऑस्ट्रेलियातील बायो-बबलचे नियम आहेत. इंग्लंड टीम टी20 वर्ल्ड कपनंतर थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाच टेस्ट मॅचची ही सीरिज 8 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.

‘टेलीग्राफ’ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडच्या सीनिअर खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (CA) त्यांची अट मान्य केली नाही तर दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यावर खेळाडूंना कुटुंबासह जाण्याची परवानगी देण्याची अट क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मान्य केली नाही तर हा टोकाचा निर्णय घेण्याचं खेळाडूंनी ठरवलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) याबाबत ऑस्ट्रेलियन बोर्डाला इशारा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्या कुटुंबासह आली आहे, याकडेही या खेळाडूंनी लक्ष वेधलं आहे.

प्रोफेशनल क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्त्यानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार, ‘या प्रकरणात अद्याप काही सांगितले जाऊ शकत नाही.सध्या परिस्थिती वेगानं बदलत आहे. मात्र, नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे. सध्याचे नियम सुरू राहले तर इंग्लंडचे खेळाडू जवळपास 50 वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबाच्या शिवाय ऑस्ट्रेलियामध्ये जातील. यापूर्वी 1960 साली हा प्रकार घडला होता. अर्थात भारतीय टीमला त्यांच्या कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याची गेल्यावर्षी परवानगी देण्यात आली होती.’

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणाीर आहे. 5 टेस्टच्या या सीरिजसाठी खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावं लागेल. त्यानंतर इंग्लंडची टीम सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर पाकिस्तानचा दौरा असून हा दौरा संपल्यानंतर यूएईमध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लिश खेळाडू सहभागी होतील.

टी20 वर्ल्ड कपनंतर लगेच ऑस्ट्रेलियासाठी खेळाडू रवाना होतील. ऑस्ट्रेलियाचा दौरा 18 जानेवारी रोजी संपल्यानंतर टीम वेस्ट इंडिजला जाणार आहे. याचाच अर्थ फेब्रुवारीपर्यंत इंग्लंड टीमचे खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *