पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ ; सायबर पोलीस ठाण्यात दररोज 40 ते 50 तक्रारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणावर वाढल्याने सायबर गुन्ह्यांतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. विविध आमिषे, प्रलोभने दाखवत, भूलथापा देत, गिफ्ट देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांकडून पुणेकारांना फसविले जात आहे. वाढती सायबर गुन्हेगारी पुणे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात दिवसाला 40 ते 50 तक्रारी दाखल होत आहेत. मागील सात महिन्यांत सायबर पोलीस ठाण्यात तब्बल 10 हजारांवर तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. दरम्यान, सायबर पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून खबरदारी घेतली जात नसल्यामुळे फसवणूकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

शिक्षण, नोकरी, कामधंदा, व्यवसाय करण्यासाठी नागरिकांची पुणे शहरात गर्दी वाढत आहे. किरकोळ कारणांवरून खून, मारामारी, जबरी चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यासोबतच सायबर गुन्हेही वाढले असून दर महिन्याला किमान दीड हजारांवर तक्रारींची नोंद पुणे सायबर पोलीस ठाण्यात केली जात आहे. जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान 10 हजारांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तुलनेत गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी कमी असताना, सायबर गुन्हेगारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत सात महिन्यांत 10 हजारांवर सायबर गुन्ह्यांचे अर्ज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे स्वंतत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. 2019 या वर्षात सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्ह्यांचे 7 हजार 795 अर्ज आले होते. त्यामध्ये नागरिकांच्या आर्थिक फसवणूकचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर 2020 मध्ये सायबर पोलीस ठाण्यांकडे 14 हजारांवर अर्ज आले आहेत. हे प्रमाण तुलनेत दुपटीपेक्षा जास्त होते. त्यानंतर जुलै 2021 पर्यंत 10 हजारांवर सायबर फसवणूकीचे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये ऑनलाईन बँकिंग फ्रॉडसह, गिफ्टचे आमिष, मोठ्या पदावर नोकरी लावण्याचे सांगून फसवणूकीत मोठी वाढ झाली आहे. सोशल मिडीयावरून होणारे गुन्हे, ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे . दरम्यान सायबर पोलीस ठाण्यात 50 ते 60 जणांचे मनुष्यबळ देण्यात आले आहे. मात्र वाढते सायबर गुन्हे एकाच सायबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे.

पुण्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण

वर्ष गुन्ह्यांची संख्या गंभीर गुन्हे

2019 7 हजार 795 8 हजार 677
2020 13 हजार 793 5 हजार 265
2021 (जुलैअखेर) 10 हजार 112 6 हजार 314

नागरिकांकडून सोशल मिडीयाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना बँकेसह एटीएम कार्डची गोपनीय माहिती देऊ नये, गिफ्टच्या आमिषासह सायबर चोरट्यांच्या फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. त्याशिवाय फेसबुक,इन्स्टाग्राम, ट्विटर, विविध बँकांचे अ‍ॅप वापरताना काळजीपूर्वक पडताळणी करणे गरजेचे आहे.
-डी. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *