महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । ‘कोव्हिशिल्ड’पुढे कोरोना निष्प्रभ ठरला आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्गाचा धोका तब्बल 93 टक्क्यांनी कमी होतो, असा दिलासादायी निष्कर्ष लसीकरणासंबंधित सर्वात मोठय़ा सर्वेक्षणातून काढला आहे. देशात लसीकरणानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ 1.6 टक्के आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या एक हजार लोकांपैकी 16 जणांनाच पुन्हा कोरोना होऊ शकतो, असे या सर्वेक्षणात आढळले आहे.
देशाच्या सशस्त्र बलांतील 15 लाख 95 हजार 630 आरोग्यसेवक व प्रंटलाइन वर्कर्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कोव्हिशिल्डची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. कोव्हिशिल्ड ही देशाच्या कोरोना लसीकरण मोहिमेतील प्रमुख लस आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ 7 टक्के संसर्गाचा धोका उरत आहे. चंदिगडच्या ‘पीजीआय’ने हा अभ्यास केला. यातील निष्कर्ष ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झाले आहेत. हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण असल्याचा संशोधकांचा दावा आहे. आतापर्यंत 10 लाखांहून कमी नमुन्यांचा अभ्यास केला गेला होता. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता. त्याचवेळी हे सर्वेक्षण केले होते, असे ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. 135 दिवस चाललेल्या या सर्वेक्षणातील निष्कर्षांनी लसीबाबत संभ्रमात असलेल्या लोकांचे टेन्शन दूर केले आहे.