महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । कोरोनाच्या संकटात झिका व्हायरसचा रुग्ण पुण्यात आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नये. या आजाराचे संक्रमण झालेले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना सुरू आहेत, असे राजेश टोपे म्हणाले.
पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली असून हा राज्यातील पहिला रुग्ण आहे. झिकाचा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी आले आहे. या भागात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.