श्रावण महिन्याचं महत्त्व ; पहिला श्रावणी सोमवार ! पूजा आणि व्रताचं महत्त्वं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । श्रावण हा व्रत-वैकल्यांचा, सणावारांचा असा पवित्र मानला जाणारा महिना सुरू होत आहे. यंदा श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस हा सोमवार आहे. तुम्हाला माहितचं असेल कि श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. श्रावणाचा महिना आणि सोमवार हे शंकराच्या पूजेसाठी विशेष आहेत. त्यामुळे, या दिवशी शंकराच्या प्रत्येक लहान-मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळतेच. श्रावणी सोमवारचं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होतात. सगळे त्रास दूर होतात, अशी देखील श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर, आज आपण श्रावणातील सोमवारी केल्या जाणाऱ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व नेमकं काय सांगितलं जातं? जाणून घेऊया.

श्रावणी सोमवारची पूजा, परंपरेनुसार….
– सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे
– प्रार्थनास्थळ स्वच्छ करावं
– उपवासाला सुरुवात करावी.
– सकाळी आणि संध्याकाळी शंकराची पूजा करावी
– तिळाच्या तेलाचा दिवा लावून शंकराला फुलं अर्पण करावीत
– भगवान शंकराच्या मंत्रांचा जप आणि शनि चालीसेचं पठण करावं
– शिवलिंगाला जलाभिषेक करा आणि सुपारी, पंच अमृत, नारळ आणि बेल पानं अर्पण करावीत
– श्रावण व्रताची कथा वाचावी
– शंकराची आरती करून प्रसाद घ्यावा
– पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा.

व्रताचे फायदे
अशी श्रद्धा आहे कि, श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. अशी देखील मान्यता आहे कि, शनिदेव हे भगवान शिवाचे आवडते शिष्य असल्याने श्रावणी सोमवारच्या या व्रताने भगवान शंकरासह शनिदेवही प्रसन्न होतात. त्याचसोबत, चंद्र दोष, ग्रहण दोष किंवा सर्प दोष असला तर यांतून मुक्त होण्यासाठी देखील अनेकजण हे व्रत करतात.

पौराणिक कथेनुसार, पार्वतीने या महिन्यात उपास करून भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर उपवास ठेवले होते. असं मानलं जातं की, या कारणामुळे हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच, या महिन्यात भक्त शंकराच्या पिंडीवर पाणी अर्पण करतात. त्याचप्रमाणे, श्रावणाच्या या महिन्यात रुद्राभिषेक करणं देखील खूप फलदायी असल्याचं सांगितलं जातं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *