Avinash Bhosale : अविनाश भोसले यांना ईडीचा दणका ; पुण्यातील 4 कोटींची संपत्ती जप्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची तब्बल 4 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. पुण्यातील ABIL अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा ईडीने जप्त केली आहे. या जमिनीची किंमत चार कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासूनपुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) आणि त्यांचा मुलगा अमित हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्याच महिन्यात त्यांची 5 तास चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवलं होतं. पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.

40 कोटींची मालमत्ता जप्त
अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

मुंबईत 103 कोटींच्या फ्लॅटची खरेदी!
अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

भोसले यांची ईडीविरोधात याचिका
बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. याबाबत ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी ईडीने 11 फेब्रुवारीला भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती.

या चौकशीनंतर 12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं.

कोण आहेत अविनाश भोसले?
रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.
अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.
कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत.
नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *