श्रावणातील उपवास ; उपवासाला या गोष्टी टाळा ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । अनेक जण श्रावण महिना अगदी कडक पाळतात. अनेकांसाठी हा महिना पूर्ण शाकाहार, भक्तिभाव आणि उपवासांचा असतो. श्रावणी सोमवारपासून, अगदी या महिन्यात येणारे विविध सण आणि स्वतःहून ठरवलेली व्रतं असे बहुतांश दिवस उपवासात जातात. प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या पद्धतीने आणि श्रद्धेने हे उपवास करत असतात. मात्र, हे करताना आपल्या प्रकृतीवर याचा विपरीत परिणाम होणार नाही ना? ह्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण, अनेकांना चुकीच्या पद्धतीने उपवास केल्याने त्रास अनुभवावा लागतो. काहींना खूप थकवा येतो तर काहीजण पित्ताच्या त्रासाने हैराण होतात. ह्यावर उपाय काय?

आपण सामान्यतः उपवासासाठी जे पदार्थ खातो ते खरंतर पित्त वाढवणारे किंवा पचायला जड असतात. त्यामुळे या पदार्थांचा उलट त्रास होऊ शकतो. उदा. जास्त प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा इ. खाणं. त्यात अनेकजण उपवासाला अतिरिक्त प्रमाणात चहा देखील पितात. त्यामुळे एकूण सगळ्याची भर पडते. साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ, साबुदाण्याच्या पिठाचे साजूक तुपातले लाडू हे पदार्थ अगदी जरी रुचकर लागत असले तरीही त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने यांचा अंश नगण्य असतो. वडे, खीर, लाडू या पदार्थामध्ये तेल आणि साखरेचाही वापर भरपूर असतो. पण ‘पौष्टिक’ असं या पदार्थात काहीच नसतं. मग उपवासाला नेमकं खायचं तरी काय? असाच प्रश्न पडलाय ना? चला तर जाणून घेऊया

पौष्टिक पर्याय
सर्वप्रथम उपवासाला सतत साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा या पदार्थांचं अतिरिक्त प्रमाणात सेवन करण्यापेक्षा शिंगाड्याचं पीठ, राजगिरा, राजगिऱ्याचे पीठ, वरी यांसारख्या काही पौष्टिक पर्यायांचा वापर करून पाहा.

भरपूर फळं
कोणतेही तेलकट, पित्तवर्धक किंवा पचायला जड असे पदार्थ खाण्यापेक्षा फळं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
केळी, डाळिंब, कच्चे अंजीर, संत्रं, मोसंबी अशी ताजी फळं तुम्ही खाऊ शकता.
सफरचंद, डाळिंब, केळं, पेर या फळांचं गाईच्या दुधात केलेलं फ्रुट सॅलड देखील एक चांगला पर्याय आहे.
साजूक तुपात केळ्यांचे काप, साखर, खोबरं, थोडंसं दूध आणि वेलची घालून केलेला हलवादेखील अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक ठरतो.
पाणी भरपूर
निर्जल उपवास कधीही करू नका. लक्षात घ्या कि पाणी न प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे, याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
भरपूर प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. याचसोबत अन्यही पेय आणि सरबतांचं देखील सेवन करू शकता.
शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी, खस सरबत, कोकम सरबत इ. सेवन तुम्ही करू शकता.
हळदीचं दूध, मिल्कशेक हे देखील चांगले पर्याय आहेत.
ताक, दही हे देखील चांगले पर्याय आहेत.
ड्रायफ्रूट्स, पौष्टिक लाडू
फळं, दूध, सरबतांसह खजूर, अंजीर, मनुका, बदाम, खारीक यांसारखे ड्रायफ्रूट्स किंवा एखादा उकडलेला बटाटा किंवा रताळे, राजगिऱ्याचा लाडू वा चिक्की, गूळ घालून केलेला शेंगदाण्याचा लाडू किंवा शिंगाडय़ाचे पीठ आणि खजूराचा लाडू हे देखील पदार्थ चांगले. खडीसाखर, सुकं खोबरं हे देखील चांगले पर्याय आहेत. खिरापतीमध्ये यांचा समावेश होऊ शकतो.

शारीरिक-मानसिक आरोग्य
तुम्ही उपवासादरम्यान सकाळी आणि संध्याकाळी प्राणायाम करणं उत्तम ठरेल. यावेळी तुम्ही आपल्या शारीरिक आणि मानसिक विश्रांती, आरोग्याला पूर्ण प्राधान्य द्यायला हवं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *