महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजारा ऐवजी हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तिसऱ्या स्थानावर पुजारा ऐवजी हनुमा विहारी खेळण्यासाठी मैदानात उतरेल असं सांगितलं जात आहे. 27 वर्षाच्या हनुमाने 12 कसोटी सामन्यात 624 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची हीच कामगिरी टीम इंडियासाठी फायद्याची ठरू शकते. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याकरता दोन्ही संघ रणनीती आखत आहेत. इंग्लंड संघाने आपला महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघाला कायम संकटात टाकणाऱ्या मोईन अलीला (Moeen Ali) बोलावून घेतलं आहे.
मोइन अली इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध एक घातक खेळाडू म्हणून मागील दोन दौऱ्यात समोर आला होता. भारताने 2014 आणि 2018 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. याचवेळी मोइन अलीने सात सामन्यात 22.22 च्या सरासरीने 31 विकेट्स घेतले होते. यात 2014 च्या साउदम्पटन कसोटीत तर त्याने एका सामन्यात आठ विकेट्सही पटकावले होते. तर 2018 मध्ये अलीने पहिल्या सामन्यात 10 विकेट्स घेतले होते.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत दुखापत झाल्यानंतरही हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आपल्या फलंदाजीनं उत्तर दिलं. सिडनी कसोटीत कांगारू संघ सामना जिंकण्याच्या मार्गावर होता, पण हनुमा विहारीने आपल्या तुफानी फलंदाजीनं सामना ड्रॉ केला.