जगभरातील नेत्यांकडे अफगानिस्तानचा गोलंदाज राशिद खानने केली मदतीसाठी विनंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी परतल्यानंतर तालिबानची क्रूरता वाढतच चालली आहे. अफगाणिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबान एकापाठोपाठ एक वेगाने ताबा मिळवत आहे. टोलो न्यूजनुसार, भारताने अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-जरंज महामार्गावरही तालिबान लढाऊंनी ताबा मिळवला आहे. दरम्यान, तालिबानशी तीव्र लढाई दरम्यान आज आपल्या नागरिकांना भारताने अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. अशातच अफगानिस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातील नेत्यांकडे मदतीची विनंती केली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राशिद खानने जगभरातील नेत्यांकडे मदत मागितली आहे. प्रिय जागतिक नेत्यांनो! माझा देश अराजकातेत आहे. मुले आणि महिलांसह हजारो निष्पाप लोक दररोज शहीद होत आहेत. घरे आणि मालमत्ता नष्ट होत आहे. हजारो कुटुंबे विस्थापित होत आहेत. आम्हाला संकटात टाकू नका. अफगाण्यांना मारणे आणि अफगाणिस्तानचा नाश करणे थांबवा. आम्हाला शांतता हवी असल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत सहा प्रांतीय राजधानी तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, भारत सरकारने अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर मजार-ए-शरीफ येथून आपले मुत्सद्दी आणि नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात मंगळवारी संध्याकाळी अफगाणिस्तानातील उत्तर शहर मजार-ए-शरीफ येथून एक विशेष विमान नवी दिल्लीला रवाना होणार आहे.

तालिबान लढाऊ आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये अफगाणिस्तानच्या बल्ख आणि तखार प्रांतात तीव्र लढाई दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानने अलीकडेच उत्तर बल्खचे अनेक भाग काबीज केले. आता त्यांचे लक्ष्य मजार-ए-शरीफ आहे. मजार-ए-शरीफ बाल्ख प्रांताची राजधानी आणि अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *