महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । बंगळुरू, इंडोनेशिया आणि अमेरिकेत कोविडचा पुन्हा झालेला उद्रेक आणि शाळकरी विद्यार्थ्यांकडून कुटुंबीयांना होणाऱया कोविडच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्यातील शाळा तूर्तास सुरू करू नये अशी शिफारस कोविड टास्क फोर्सने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे सध्या तरी शाळांचे दरवाजे उघडणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याची शिक्षण विभागाची योजना होती. पण त्यापूर्वी सरकारने कोविड टास्क फोर्सशी चर्चा केली. त्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांकडून कोविडचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन तूर्तास शाळा सुरू न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, टास्क फोर्समधील बाल रोगतज्ञांच्या मते सध्या तरी शाळा घाईघाईने उघडू नयेत. राज्यातील काही ग्रामीण भाग सोडला तर शाळांमध्ये शालेय शिक्षक व कर्मचाऱयांना दोन लसी देणे गरजेचे आहे. शाळेत मुलांकडून मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे आणि मुलांकडून घरातील इतरांना संसर्ग होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.