महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. देशभरातील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यातून हायवेवर केली जाणारी टोलवसुली वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रात मनसेने टोल आकारणीविरोधात आंदोलनही केले होते.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकार टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असून, आगामी तीन महिन्यात ही योजना प्रत्यक्षात येऊ शकते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल. यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही, तर केवळ टोलनाके हटवणे असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल, तेव्हा जीपीएसच्या मदतीने कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसेच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार ,वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे. जीपीएस ट्रॅकिंगची यंत्रणेच्या चाचणीचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यात यावर धोरण निश्चित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत ही योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, टप्प्याटप्प्याने हायवेवरील सर्व टोलनाके बंद करण्यात येतील. ही यंत्रणा यानंतर जीपीएस प्रणालीवर चालेल, असे गडकरी यांनी सांगितले.