राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या 10 जणांना डेल्टा प्लसची लागण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । कोरोनानंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचा धोका असल्याचं चित्र आहे. डेल्टा प्लसमुळे राज्यात 5 जणांचा बळी गेल्याचीही माहिती आहे. सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात 66 रूग्ण असल्याची नोंद आहे. तर महत्त्वाचं म्हणजे राज्यात डेल्टा प्लसची लागण झालेल्यांपैकी 10 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना विषाणूपाठोपाठ डेल्टा प्लसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत आतापर्यंत ‘डेल्टा प्लस क्हेरियंट’चे 66 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 10 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. डेल्टा प्लसमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात डेल्टा प्लसची लागण झालेल्या रूग्णांची माहिती काढली असता त्यामध्ये 10 जणांचे दोन्ही डोस तर 8 जणांनी लसीचा 1 डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी 2 जणांनी कोवॅक्सिन तर इतर सर्वांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलीये.

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोविड विषाणूचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरूपात करण्यात येत आहे. दर महिन्याला प्रत्येक जिह्यातून 100 नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते. राज्य सरकारने यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅन्ड इन्टीग्रेडेट बायोलॉजीसोबत करार केला असून त्यांच्या तपासणीत राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जळगावमध्ये 13, रत्नागिरी 12, मुंबई 11, ठाणे 6, पुणे 6, पालघर आणि रायगडमध्ये 3-3, नांदेड आणि गोंदिया मध्ये 2-2, चंद्रपुर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापुर आणि बीड या ठिकाणी प्रत्येकी 1-1 रूग्ण आहे.

‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड मध्ये प्रत्येकी 1-1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता ठाणे जिल्ह्यात आणखी एका डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे आता राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या 66 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *