महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला पहाटेचा महाभिषेक,आरती झाल्यानंतर शिवलिंग विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले. ॐ नम:शिवाय म्हणत दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने शिवभक्त भिमाशंकरला हजेरी लावतात.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांविना श्रावण महिन्यातील भिमाशंकरची यात्रा सुरु आहे. शिवभक्तांविनाच श्रावण महिन्यातील उत्सव धार्मिक परंपरांचे जतन करत सुरु आहे.
डोंगराळ आदिवासी भागातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर परिसरात, हार,फुले,प्रसाद,धार्मिक साहित्य,खेळणी अशा विविध वस्तूंच्या विक्रीची बाजारपेठ उभी राहिली.मात्र हिच बाजारपेठ गेल्या दीड वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहे.
मागील दिड वर्षांपासून भिमाशंकर मंदिर बंद असल्याने या परिसरातले असंख्य व्यवसाय बंद पडले आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह याच दुकानांवर अवलंबुन आहे. मात्र पुन्हा श्रावण मासातील व्यवसायाच्या वेळेतच संचारबंदी लागू असल्याने येथील दुकाने बंद ठेवली आहे.