महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । लंडन : अमेरिका-इंग्लंडसारख्या (america england) देशांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण (vaccine) झाल्यानंतरही कोरोनाच्या (corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातही डेल्टा व्हेरिएन्टच्या (delta varient) अनेक नव्या रुग्णांची भर पडत आहे. डेल्टा (delta) आणि डेल्टा प्लसचे (delta plus) विषाणू नाक आणि घशामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग करत आहे. त्यावर उपाय म्हणून इंट्रा-नेझल स्प्रेद्वारे लस दिल्यास ती नाक व घशातील विषाणूविरोधात प्रभावीपणे काम करत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सर्वात प्रभावी उपाय म्हणून संपूर्ण जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे; मात्र लसीकरणानंतरही अनेक देशांमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही व्हेरिएन्ट नाक आणि घशामध्ये संसर्ग करतात. सध्या हातावरील स्नायूत दिल्या जाणाऱ्या लशीचा प्रभाव नाक आणि घशातील विषाणूवर कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण झालेली व्यक्तीही निरोगी व्यक्तीला संसर्ग करत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस इन्ट्रा-नेझल स्वरूपात दिल्यास नाक व घशातील विषाणूवर प्रभावीपणे मात करत असल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.