महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । गुणवत्ता डावलून अकरावीत मनमानी प्रवेशाला मोकळे रान मिळाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले असून इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश कॉलेज स्तरावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिपत्रकामुळे अकरावी प्रवेशात मोठय़ा प्रमाणात वशिलेबाजी होणार असून गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.
इनहाऊस कोटय़ातून संस्थेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 टक्के प्रवेश मिळतात, व्यवस्थापन कोटय़ातील 5 टक्के आणि अल्पसंख्याक शाळांमधील आणि अल्पसंख्याक कोटय़ामध्ये 50 टक्के अशा एकूण 65 टक्के जागा अकरावी प्रवेशात राखीव असतात. या जागा मागील वर्षांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरल्या जात होत्या. मात्र शिक्षण संचालनालयाने काढलेल्या नवीन परिपत्रकामुळे या सर्व जागा कॉलेज स्तरावर मनमानीपणे भरल्या जाणार आहेत.