न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही – नारायण राणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना २४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी शिवसेना भाजपमध्ये झडू लागल्या आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. जन आशीर्वाद यात्रेला २७ ऑगस्टपासून पुन्हा सुरुवात होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणे यांना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

माझ्या बाजूने दोन्ही निकाल लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचे राज्य असल्याचे दिसून येते. माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा काही जण फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु आहे.

दुसरे मला देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद दिले. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना सांगितले की, तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. तुमच्या कामकाजाला सुरुवात करा. मी माझ्या जन आशीर्वाद यात्रेला १९ ऑगस्टपासून सुरुवात केली. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नसल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. माझ्यामागे भाजप खंबीरपणे उभा राहिला, त्यासाठी नड्डा साहेब, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वांचे मला पाठबळ मिळाले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचेही त्यांनी पुढे म्हटले.

मी असे काय बोललो होतो, ज्याचा एवढा राग आला. मी ते वाक्य परत बोलणार नाही. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. एखादी गोष्ट भुतकाळामध्ये घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. देशाबद्दल ज्यांना अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहित नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झाले नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *