महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते नारायण राणे यांना शिवसेनेने इंगा दाखवल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सध्या मुंबई आणि दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. भाजपचे चाणक्य अमित शाह (Amit Shah) यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे (Narayan Rane) यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनाही सावध झाली आहे. भाजपच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेल्या खासदार संजय राऊत यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहे. संजय राऊत हे सध्या भुवनेश्वरच्या दौऱ्यावर होते. मात्र, गेल्या दोन दिवसांमधील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय चित्र कमालीचे पालटले आहे. त्यामुळे संजय राऊत भुवनेश्वर दौरा अर्धवट सोडून गुरुवारी तातडीने मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यानंतर संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता संजय राऊत भाजपचा हल्ला कसा परतावून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अमित शाह राणेंशी फोनवर काय बोलले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नारायण राणे (Narayan Rane) यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली.