महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । रिअल इस्टेट क्षेत्राला कोरोना महामारीतही तेजीचे दिवस आले आहेत. पुढील वर्षभरात घरांच्या किमतींमध्ये वाढ होईल. तसेच मुंबईतील जवळपास 69 टक्के घरमालकांना त्यांच्या घराला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. देशातील आघाडीची मालमत्ता सल्लागार कंपनी असलेल्या ‘नाईट फ्रँक’च्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महामारीमुळे घर खरेदीदारांचा दृष्टिकोन बदलल्याचे या अहवालात म्हटले आहे.
‘नाईट फ्रँक’ने ’इंडियन रेसिडेन्शिअल बायर प्रीफरन्स रिपोर्ट-2021ः लिव्हिंग इन दि टाइम्स ऑफ कोविड-19’ या शिर्षकाखाली सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये रिअल इस्टेटच्या बदललेल्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे. कंपनीच्या अहवालानुसार पुढील 12 महिन्यांमध्ये प्राथमिक घरांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची आशा आहे. देशामध्ये मुंबईतील घरांच्या किमती सर्वाधिक वाढतील. शहरातील 35 टक्के लोक दुसऱया शहरांमध्ये स्थलांतरित होण्यास इच्छुक आहेत. शहरांतर्गत स्थलांतरित होणाऱयांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. 58 टक्के घरमालकांना त्यांच्या घराच्या किमतीत 1 ते 9 टक्क्यांनी वाढ होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 68 टक्के लोकांनी महामारीमुळे घरांच्या किमतीमध्ये घट होण्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, जगभरातील प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती पुढील वर्षभरात आपल्या हक्काच्या नव्या घरात शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे, असाही निष्कर्ष ‘नाईट फ्रँक’ने काढला आहे.